पोर्ट ऑफ स्पेन : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने शानदार अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट 87 धावांवर नाबाद असून तो शतकापासून केवळ 13 धावा दूर आहे. या 87 धावांच्या शानदार खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने शतक झळकावले तर तो भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल.
- 500 व्या सामन्यात अर्धशतक करणारा पहिला खेळाडू : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावून 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक ठोकणारा विराट कोहली पहिला फलंदाज बनला आहे. विराटने 163 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या आहेत.
- सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 व्या क्रमांकावर :विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 5 वा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने 87 धावांच्या खेळीदरम्यान 74 वी धावा करताच जॅक कॅलिसचा (25534 धावा) विक्रम मोडला. विराट कोहलीच्या नावावर आता 25548 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. त्याच्या पुढे फक्त महेला जयवर्धने (25957 धावा), रिकी पाँटिंग (27483 धावा), कुमार संगकारा (28016 धावा) आणि सचिन तेंडुलकर (34357 धावा) आहेत.
- WTC च्या इतिहासात 2000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज :विराट कोहली WTC च्या इतिहासात 2000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त भारतीय कर्णधार रोहित शर्माला WTC मध्ये 2000 धावा करता आल्या आहेत.
- शतक झळकावताच विराट सचिनचा विक्रम मोडेल :वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट 87 धावा करून नाबाद आहे. तो आपल्या शतकापासून केवळ 13 धावा दूर आहे. विराटने आज शतक झळकावल्यास हे त्याचे 76 वे आंतरराष्ट्रीय शतक असेल आणि तो 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळून सर्वाधिक शतके करण्याचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकरने 500 सामन्यांत 75 शतके नोंदवली होती.