नवी दिल्ली :भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात नेहमीच तुलना केली जाते. अनेक क्रिकेट पंडित बाबर आझमला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. तर कोहलीचे रेकॉर्ड मोडण्याची क्षमता केवळ बाबर आझममध्येच आहे, असेही अनेक जणांचे मत आहे. आता याला खुद्द विराट कोहलीनेच पावती दिली आहे.
बाबरला खेळताना पाहणे नेहमीच आवडते : स्टार स्पोर्ट्ससोबतच्या एका संभाषणात विराट कोहलीने बाबर आझमला सर्व फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हटले आहे. या सोबतच कोहलीने बाबरच्या फलंदाजीचेही तोंडभरून कौतुक केले. 'बाबर आझम सर्व फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल फलंदाज आहे यात शंका नाही. तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे. मला त्याला खेळताना पाहणे नेहमीच आवडते', असे विराट कोहली म्हणाला.
बाबरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला :या सोबतच विराटने बाबरसोबत झालेल्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. एका मुलाखतीचा संदर्भ देताना कोहली म्हणाला की, 'बाबरसोबत माझे पहिले संभाषण 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मँचेस्टरमधील मॅचनंतर झाले. मी इमाद वसीमला अंडर-19 विश्वचषकापासून ओळखतो. तो म्हणाला की बाबरला माझ्याशी बोलायचे आहे. त्यानंतर आम्ही बसून क्रिकेटबद्दल बोललो. पहिल्या दिवसापासून मला त्याच्यामध्ये माझ्याबद्दल खूप आदर दिसला. आजपर्यंत यात कोणताही बदल झालेला नाही', असे विराटने सांगितले.