दुबई : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तीन सामन्यांत दोन शतके आणि 283 धावा करणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. कोहलीने दोन स्थानांनी झेप घेत क्रमवारीत 750 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. कोहलीचे टीम इंडियातील सहकारी शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. हैदराबाद येथे न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र फार्मात असलेला कोहली स्वस्तात बाद झाला. विराट कोहली 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. फिरकीपटू मिचेल सँटनरने त्याला क्लीन बोल्ड केले. कोहलीने आपल्या डावात एक चौकार मारला.
शुभमन गिलची 10 स्थानांची झेप : ICC एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर असून त्याचे 887 गुण आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे रॅसी व्हॅन डर ड्युसेन व क्विंटन डी कॉक हे असून त्यांचे अनुक्रमे 766 आणि 759 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर असून त्याचे 747 गुण आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कोहलीला हे अंतर आणखी भरून काढण्याची संधी आहे. या मालिकेदरम्यान भारतात आपले पहिले एकदिवसीय शतक ठोकणारा गिल तब्बल 10 स्थानांची घेप घेत 26 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या या युवा सलामीवीराने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 69 च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत.