ऑकलंड - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केलं आहे. विराट आणि जेमिसन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतात.
कायले जेमिसन म्हणाला की, 'विराट कोहली एक चांगला माणूस आहे. तो सामना जिंकण्याचा पॅशन ठेवतो. मी त्याच्याविरुद्ध एक-दोन सामने खेळलो आहे. तो मैदानात आक्रमक होतो. पण मैदानाबाहेर तो खूप विनम्र आहे. तो जिंकणे पसंत करतो. यासाठी तो मैदानात झोकून देतो.'
कायले जेमिसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 15 करोड रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये 7 सामन्यात खेळताना 9 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने फलंदाजीत 56 धावा केल्या आहेत. आयपीएल अनुभवाबाबत कायले जेमिसन म्हणाला की, या स्पर्धेत वेगवेगळे खेळाडू कसं काम करतात हे पाहता येतं. ही चांगली बाब आहे. आमच्या संघात चांगले विदेशी खेळाडू आहेत. अशा स्पर्धेत सहभागी होणे सौभाग्याची गोष्ट आहे.
कायले जेमिसनला भारतात फिरता आले नाही. याची त्याला खंत आहे. दरम्यान, आयपीएल 2021 चा हंगाम भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विनाप्रेक्षक खेळवण्यात आला. यावेळी सर्व खेळाडू बायो बबलमध्ये होते. पण मे महिन्यात काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा बीसीसीआयने स्पर्धा मध्यात स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या उर्वरित हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ या हंगामातील 7 सामन्यात 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. 20 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने उर्वरित हंगामाच्या अभिनाला सुरूवात करेल.
हेही वाचा -Ind Vs Eng 3rd test : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
हेही वाचा -भारतीय महिला संघासाठी वाईट बातमी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या कारण