मुंबई - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही महत्वाची वक्तव्य केली आहेत. त्याची वक्तव्ये पाहता भारतीय कसोटी संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय फलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळे भारताचा अंतिम सामन्यात पराभव झाला. त्यामुळे विराटने फलंदाजावर या पराभवाचे खापर फोडलं आहे. त्याने कोणाचेही नाव न घेता फलंदाजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. विराट म्हणाला, 'संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार आम्ही करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत.'
आम्हाला एक नवीन सुरुवात करुन योग्य ती योजना आखावी लागणार आहे. तसेच संघासाठी काय फायदेशीर आहे ते जाणून घेऊन आम्ही निडरपणे कसे खेळू शकणार आहोत. याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संघात आणावे लागले याचाही विचार होणार आहे. आधी मानसिक दृष्ट्या ताकदवर होऊन आम्हाला खेळ सुधारावा लागेल, असेही विराट म्हणाला.
दरम्यान, अंतिम सामन्यात भारताचा वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याने पहिल्या डावात ५४ चेंडूत केवळ ८ धावा केल्या. निराशाजनक बाब म्हणजे, पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने ३५ चेंडू खेळले. तर दुसऱ्या डावात त्याने ८० चेंडूमध्ये १५ धावांच केल्या.