मुंबई: भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore ) माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. तसेच त्याच्या फलंदाजीच्या अपयशाची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या ( Lucknow Super Giants ) सामन्यात पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. या निराशाजनक सामन्याबरोबरच कोहलीने एक निराशाजनक विक्रम केला आहे.
विराट कोहलीला मागील 100 सामन्यात शतक झळकावता आलेले नाही. क्रिकेट सांख्यिकीशास्त्रज्ञ महजार अर्शद यांनी केलेल्या ट्विटनुसार, कोहलीने आता 17 कसोटी, 21 एकदिवसीय, 25 टी-20 आणि 37 आयपीएल सामन्यांमध्ये एक ही शतक लगावलेले नाही.
मंगळवारच्या सामन्यात आरसीबीचा सलामीवीर अनुज रावत ( RCB opener Anuj Rawat ) पहिल्याच षटकात चार धावांवर बाद झाल्यानंतर कोहली फलंदाजीला आला होता. पंरतु कोहली पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये कोहलीने 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 48 आहे.
कोहली आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 214 सामन्यांमध्ये पाच शतके आणि 42 अर्धशतकांसह 6,402 धावा केल्या आहेत. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 23 हजार 650 धावांसह क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर सर्व फॉरमॅटमध्ये 34 हजार 357 धावांसह आघाडीवर आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली ( Virat Kohli ) खराब फॉर्ममधून जात आहे. तो अलीकडेच कसोटी कर्णधार पदावरुन पायउतार झाला आहे, आणि त्याच्या जागी रोहित शर्माला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद दिले आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विराटचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. मंगळवारी त्याच्या नवीन अपयशाने सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधून घेतले, अनेक नेटिझन्स त्याच्या बाजूने तर काहींनी त्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली ख्रिस गेल (6) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा -IPL 2022 DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स समोर आज पंजाब किंग्जचे आव्हान; मुंबईतील 'या' मैदानावर होणार सामना