साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर न्यूझीलंड संघाने पकड मजबूत केली आहे. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. त्यानंतर न्यूझीलंडने चहापानापर्यंत बिनबाद ३६ अशी सावध सुरूवात केली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भरमैदानात भांगडा करताना पाहायला मिळाला. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये रंगला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करता आला नाही. काइल जेमिसनने ५ गडी बाद करत भारताच्या डावाला खिंडार पाडले.