नवी दिल्ली : सध्या देशात 52 क्रिकेट स्टेडियम आहेत. 2025 पर्यंत त्यांची संख्या 53 होईल. देशातील हे 53 वे स्टेडियम भोले बाबांच्या नगरी वाराणसीमध्ये बांधले जाणार आहे. उत्तर प्रदेशातील हे तिसरे क्रीडा स्टेडियम असेल. स्टेडियमच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यंदाच्या मे-जूनच्या अखेरीस स्टेडियमच्या उभारणीचे काम सुरू होईल, असे बोलले जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही स्टेडियमच्या बांधकामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच वाराणसीला भेट दिली होती.
गांजरी गावात स्टेडियम बांधणार :योगी सरकारने गांजरी गावात 31 एकर जमीन संपादित केली आहे. हे गाव राजतलाब तालुक्यात येते. ही जमीन शेतकऱ्यांकडून सुमारे 120 कोटी रुपयांना विकत घेण्यात आली आहे. सरकार उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला (UPCA) 30 वर्षांसाठी जमीन भाडेतत्त्वावर देणार आहे. यूपीसीए भाडेपट्टीच्या बदल्यात सरकारला दरवर्षी 10 लाख रुपये देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी मे-जूनमध्ये या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये वाराणसीतून विजय मिळवून मोदी संसदेत पोहोचले आहेत.