हैदराबाद:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 वा सामना गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आले होते. या सामन्यात उमरान मलिकने ( Fast bowler Umran Malik )157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील शेवटच्या षटकात मलिकने हा चेंडू टाकला, ज्यावर पॉवेलने मिडऑफ आणि कव्हर्समधून चौकार मारला होता.
यापूर्वी 12व्या षटकात डेव्हिड वॉर्नरविरुद्ध मलिकने 154.8 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. मलिकने दिल्लीविरुद्ध सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी, त्याने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 154 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
गुजरात टायटन्सविरुद्ध मलिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. या सामन्यात त्याचा संघ सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला होता. पण वेगवान गोलंदाजाने आपल्या मेहनतीने खूप प्रभावित केले, उमरानने गुजरात टायटन्सविरुद्ध 25 धावांत पाच बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात फक्त मलिकनेच सर्व विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या अन्य गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. उमरानबद्दल सध्या बरीच चर्चा होत असून त्याला भारतीय संघात समाविष्ट करण्याची जोरदार मागणी होत आहे. अलीकडेच, भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळायला हवे.
विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शॉन टॅटच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने 157.71 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. यानंतर उमरान मलिक दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, ज्याने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. तिसऱ्या क्रमांकावर एनरिच नॉर्टजे आहे, ज्याने 156.22 आणि 155.21 आणि 154.74 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्यानंतर डेल स्टेन 154.4 किमी प्रतितास वेगासह चौथ्या आणि कागिसो रबाडा 154.23 किमी प्रतितास वेगासह पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा -Neeraj Chopra Car Accident : गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कारला अपघात, हरियाणा रोडवेजच्या बसने दिली धडक