मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे रंगला आहे. भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर 364 धावा केल्या आहेत. इंग्लंडने ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परंतु या सामन्यात प्रेक्षकांनी के एल राहुलच्या अंगावर थॅम्पेन बाटलीचे कॉर्क म्हणजे बाटलीचे झाकण फेकल्याचे समोर आलं आहे.
इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना ही घटना घडली. के राहुल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. तेव्हा काही उपद्रवी प्रेक्षकांनी के एल राहुलच्या अंगावर थॅम्पेन बाटलीचे कॉर्क फेकले. प्रेक्षकांचे असभ्य वर्तन पाहून विराट कोहली के एल राहुलजवळ पोहोचला. त्याने रागात राहुलला ते कॉर्क प्रेक्षकांच्या दिशेने फेकण्यास सांगितले.
विराटचा स्पष्ट आवाज येत नव्हता. पण त्याचे इशारे पाहता तो राहुलला ते कॉर्क प्रेक्षकांकडे फेकण्यास सांगत होता. दरम्यान, प्रेक्षकांनी केलेले हे असभ्य वर्तन भारतीय चाहत्यांना आवडले नाही. याविषयी भारतीय चाहते सोशल मीडियावर कडवी प्रतिक्रिया देत आहेत.