दुबई -आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे. सर्व संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यान, आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे थीम साँग लाँच केले आहे.
आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी थीम साँग लाँच केले आहे. या गाण्याचे नाव लाईव्ह द गेम असे आहे. याविषयीची माहिती आयसीसीने दिली आहे. या गाण्याला संगीतकार अमित त्रिवेदी यांनी कम्पोज केले आहे.
थीम साँगमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान, वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार केरॉन पोलार्ड आणि ग्लेन मॅक्सवेल यांना अॅनिमेटेड अवतारामध्ये दाखवण्यात आले आहे. याशिवाय या गाण्यात युवा चाहत्यासोबत अॅनिमेशनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.