किंग्जस्टोन -वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक झाला. यजमान वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात 1 विकेटने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण याने विंडीज संघाचे कौतुक केले.
व्ही. व्ही. एस लक्ष्मण म्हणाला की, सबिना पार्कवर झालेल्या अविश्वसनीय सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. हा विजय आयुष्यभरात आठवणीत राहणारा आहे. केमार रोचने चांगली फलंदाजी केली. तर युवा जायडेन सिल्स याने आपण भविष्य असल्याचे दाखवून दिले.
दरम्यान, जायडेन सिल्स याने या सामन्यात पाच गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाला 203 धावांपर्यंत मजल मारता आली. तो अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा युवा खेळाडू ठरला. त्याने 19 वर्ष 338 दिवसांचा असताना ही किमया केली.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अवस्था 3 बाद 38 अशी केविलवाणी झाली. तेव्हा जेरमिन ब्लॅकवूड आणि रोस्टन चेज या जोडीने 68 धावांची भागिदारी करत संघाचा सुस्थितीत आणले. तेव्हा फहिम अश्रफ आणि हसन अलीने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजची अवस्था 8 बाद 142 अशी केली. अशात आणखी एक विकेट गेली.