नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेला कसोटी सामना अनिर्णितेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. टीम इंडियासाठी ही संधी न्यूझीलंडने ख्राईस्टचर्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे शक्य झाली आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या विजयामुळे भारत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना : भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी अहमदाबाद कसोटीत विजय मिळवणे किंवा न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा पराभव किंवा अनिर्णित राहणे अपेक्षित होते. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात श्रीलंकन संघाचा 2 गडी राखून पराभव करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणार आहे. सध्या उभय संघांमधील चार कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आह. या चौथ्या कसोटी सामन्याची अनिर्णितकडे वाटचाल चालू आहे. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.