मेलबर्न: आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष टी-20 विश्वचषक 2022 (The Men's T20 World Cup 2022) स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केली आहे. ही स्पर्धा 2020 मध्ये पार पडणार होती. मात्र कोरोना महामारीने या स्पर्धेला विलंब झाला. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या खांद्यावर असणार आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2022 या स्पर्धेला 16 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा शेवटचा सामना 13 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेचे आयोजन हे 2021 च्या स्पर्धेप्रमाणे असणार आहे. तसेच पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान या स्पर्धेच्या माध्यमातून भिडणार आहेत.
या स्पर्धेत एकूण 16 देशांच्या संघाचा सहभाग असणार आहे. त्यापैकी सुपर 12 संघ (Super 12 Team) या स्पर्धेसाठी थेट पात्र आहेत. तर उर्वरित संघाना आपली पात्रता फेरी खेळून मुख्य स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. या स्पर्धेतील सलामीचा सामना श्रीलंका आणि नामिबिया याच्यात पार पडेल . त्याचबरोबर सुपर-12 चा पहिला सामना 22 ऑक्टोबरला पार पडेल. हा सामना गतविजेते ऑस्ट्रेलिया (Defending Champion Australia)आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडणार आहे.
कट्टरप्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाईल. तत्पुर्वी मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने या स्पर्धेत सहभागी होईल.