नवी दिल्ली T20 World Cup 2024 :2023 चा एकदिवसीय विश्वचषक संपून अवघे काही दिवस झाले आहेत. यानंतर आता 2024 मध्ये टी 20 विश्वचषकही होणार आहे. पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेचं चित्र आता स्पष्ट झालंय. हा विश्वचषक नवीन फॉरमॅटसह खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. टी20 विश्वचषक 2024 साठी पात्रता फेरीचे सामनेही पूर्ण झाले आहेत.
कशा पद्धतीनं खेळवला जाणार विश्वचषक : क्वालिफायर सामन्यांमध्ये झिम्बाब्वेला पात्रता मिळवता आलेली नाही. झिम्बाब्वेला हा फार मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्या गटातील नामिबिया आणि युगांडा यासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच युगांडा या मुख्य स्पर्धेसाठी पात्र झालाय. आता पात्रता फेरी पूर्ण झाली आहे. आता या विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकासाठी प्रत्येकी पाच संघांचे चार गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. त्यांच्या गटातील दोन संघ पुढील टप्प्यात उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जे सुपर 8 म्हणून ओळखलं जाईल. तिथूनच संघ अंतिम फेरीसाठी लढतील.
टी20 विश्वचषकाचा इतिहास काय : आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. तर मागील आयसीसी टी 20 क्रिकेट विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान खेळवला गेला होता. टी 20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे एकमेव संघ आहेत. जे आतापर्यंत दोनदा विश्वचषक विजेते ठरले आहेत.