कोलंबो -सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि युवा अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल-हकमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. यावेळी संतापलेल्या आफ्रिदीने नवीनला चांगल्याच शब्दांत सुनावले.
हेही वाचा- मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे?
या लीगमधील कँडी टस्कर्स आणि गाले ग्लेडिएटर्स यांच्यातील सामन्यात मोहम्मद आमिर आणि २१ वर्षीय नवीन उल हकमध्ये वाद झाला होता. आमिर हा एलपीएल स्पर्धेत गाले ग्लेडिएटर्स संघाकडून, तर नवीन कँडी टस्कर्स संघाकडून खेळत आहे. यासोबतच आफ्रिदीही ग्लेडिएटर्स संघाचा भाग आहे. सामन्यादरम्यान नवीनने आमिरबद्दल अपशब्द वापरले. सामना संपेपर्यंत नवीनने आपली तोफ सुरूच ठेवली.
लंका प्रीमियर लीगमध्ये युवा खेळाडूवर संतापला आफ्रिदी सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत होते. तेव्हा आफ्रिदीने नवीनला रागात विचारले, काय झाले? असे रागात विचारले. तेव्हा नवीननेही रागातच उत्तर दिले. त्यानंतर आफ्रिदीने प्रत्युत्तर देत म्हटले, ''बाळा तुझा जन्म होण्यापूर्वी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते.''
कँडी टस्कर्सचा गाले ग्लेडिएटर्सवर विजय -
या सामन्यात कँडीच्या संघाने गाले संघावर मात करत स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला. टस्कर्सने २० षटकात ५ गडी गमावत १९६ धावा केल्या. ब्रेंडन टेलरने टस्कर्सकडून ३५ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली. ग्लेडिएटर्स संघाकडून गोलंदाजी करताना लक्षण संदाकनने सर्वाधिक २ बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लेडिएटर्स संघाला १७१ धावाच करता आल्या. यावेळी ग्लेडिएटर्स संघाकडून धनुष्का गुणतिलकाने सर्वाधिक ८२ धावा केल्या. टस्कर्स संघाकडून गोलंदाजी करताना नवीनने १ बळी घेतला.