रायपूर -क्रिकेटविश्वात स्फोटक सलामीवीरांची जोडी म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी दमदार पद्धतीने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजची सुरुवात केली. रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या दोघांनी भन्नाट भागीदारी रचत इंडिया लेजेंड्सला बांगलादेश लेजेंड्सवर १० गड्यांनी सहज विजय मिळवून दिला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सचिनसेनेसमोर सर्वबाद १०९ धावा केल्या. सचिन-वीरु या दोघांनीच आव्हान हे पूर्ण करून टाकले. ३५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८० धावा कुटणाऱ्या सेहवागला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, सचिनने ५ चौकारांसह ३३ धावांचे योगदान दिले. सेहवागने इंडिया लेजेंड्सच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत चाहत्यांना जुन्या सेहवागची आठवण करून दिली.
नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी घेतलेल्या बांगलादेशने उत्तम सुरुवात केली. नझमुद्दीन आणि ओमर यांनी ५९ धावांची सलामी दिली. बांगलादेश मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना फिरकीपटू प्रग्यान ओझाने ओमरला (१२) बाद केले. त्यानंतर एका षटकानंतर नझमुद्दीनही ओझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने संघाकडून सर्वाधिक ४९ धावा केल्या. यात त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला. यानंतर मात्र, बांगलादेशचे फलंदाज इंडिया लेजेंड्ससमोर टिकू शकले नाहीत. इंडिया लेजेंड्ससाठी विनय कुमार, प्रज्ञान ओझा व युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर या जोडीने डावाची सुरुवात केली. दोघांनी अवघ्या १०.१ षटकात भारताला विजयी आव्हान गाठून दिले. या मालिकेतील इंडिया लेजेंड्स संघाचा हा तिसरा विजय ठरला.