नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एक इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानची टी-२० लीग पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद करण्याची इच्छा असल्याचे आमिरने सांगितले. राजकारण बाजूला सोडून दोन्ही देशांच्या खेळाडूंना आयपीएल आणि पीएसएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी, असेही आमिरने म्हटले.
आमिर म्हणाला, "आम्ही नेहमीच म्हटले आहे, की क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ, राजकारण बाजूला सारले पाहिजे. मला आव्हान स्वीकारणे आवडते आणि मला (विराट कोहली आणि रोहित शर्मा) यांना बाद करायला आवडेल. आयपीएल असो किंवा पीएसएल, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी हे फायदेशीर ठरेल. या लीगमध्ये खेळण्यामुळे खेळाडूंना चांगले क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल."