मुंबई -माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या आधी त्यांच्या इंडिया लेजेंड्सच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. ही मालिका आजपासून सुरू होत आहे. इरफानने हा फोटो शेअर केला असून या फोटोला एक मस्त कॅप्शन दिले आहे.
निवृत्तीनंतरचा फोटो, असे कॅप्शन इरफानने फोटोला दिले आहे. दोन्ही खेळाडू हे इंडिया लेजेंड्स संघाचे भाग आहे. या संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर आहे. या स्पर्धेत इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमधील खेळाडूंनीही भाग घेतला आहे.
युसुफने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारताकडून ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे ८१०, २३६ धावा केल्या आहेत. युसुफ एक उत्तम फिरकीपटू होता. त्याने १०० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने ४८२५ धावा आणि २०१ बळी घेतले आहेत. २०१२ आणि २०१४मध्ये जेव्हा कोलकाताने आयपीएलचे विजेतेपद जिंकले तेव्हा तो या संघाचा भाग होता.
इरफानने भारताकडून २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने जानेवारी २०२०मध्ये निवृत्ती घेतली. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. त्याच्याकडे ३०१ आंतरराष्ट्रीय बळी आणि २८२१ धावा आहेत.
हेही वाचा - VIDEO : धोनी आयपीएल २०२१ च्या तयारीला लागला, असे झाले जंगी स्वागत