पुणे :महिला टी-20 चॅलेंजच्या ( Womens T20 Challenge ) यंदाच्या हंगामातील पहिला सामना सोमवारी ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात पार पडला. या सामन्यात सुपरनोव्हाने ट्रेलब्लेझर्स 49 धावांनी पराभव केला. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने 12 धावांत चार बळी घेतले. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मानधना (34), सलामीवीर हेली मॅथ्यूज (18), सोफिया डंकले (1) आणि सलमा खातून (0) यांना दोन वेगवेगळ्या स्पेलमध्ये बाद करून वस्त्राकरने गतविजेत्याच्या फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी ऍक्सलटन आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू एलाना किंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.
विजयासाठी 164 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ट्रेलब्लेझर्स संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात 114 धावाच करू शकला. तत्पूर्वी, सुपरनोव्हासने 163 धावा जोडल्या आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये ( Womens T20 Challenge Highest Score ) सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. मंधाना आणि मॅथ्यूजने पहिल्या विकेटसाठी पाच षटकांत 39 धावा जोडल्यामुळे ट्रेलब्लेझर्सची चांगली सुरुवात झाली. यानंतर वस्त्राकरने ट्रेलब्लेझर्सला तिहेरी झटका दिला. आधी तिने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यूजला बाद केले. यानंतर आठव्या षटकात चार चेंडूंत मंधाना आणि डंकले यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
ट्रेलब्लेझर्सने दहा षटकांत 71 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर 11व्या षटकात दोन विकेट पडल्या. दुसऱ्या चेंडूवर ऍक्सलटनने ऋचा घोषला (2) बाद केले, तर अरुंधती रेड्डी खाते न उघडता धावबाद झाली. दुसऱ्या स्पेलमध्ये वस्त्राकरने खातूनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेमिमा रॉड्रिग्ज (24) हिने एकट्याने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र 14व्या षटकात मेघना सिंगची शिकार केली. तत्पूर्वी, सुपरनोवाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 29 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.