मुंबई -आयपीएलचा 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( SRH Vs CSK ) यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. अभिषेक शर्माने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे ( SRH Abhieshk Sharma ) हैदराबादचा विजय सोपस्कर झाला. हैदराबादचा हंगामातील पहिला विजय तर, चेन्नईला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून फलंदाजीसाठी सलामीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा उतरले. मात्र, दोघांनी केवळ सोळा धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या मोईन अलीने 13 चेंडूत 48 धावा केल्या. तर, तिसऱ्या विकेटसाठी अंबाती रायडूने 27 धावा केल्या. शिवम दुबे (3), रविंद्र जाडेजा (23), धोनी (3), ब्राव्हो (3), जॉर्डन (6) नाबाद राहिले. वीस षटकांमध्ये चेन्नईने 154 धावांचा आव्हान हैदराबादला दिले.