नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी न्यूझीलंडचे माजी दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. व्हिटोरी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लारा यांची जागा घेणार आहेत.
आयपीएल 2023 मध्ये हैदराबादची खराब कामगिरी : आयपीएल 2023 मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हैदराबादने लाराला प्रशिक्षक पदावरून हटविले. 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. साखळी टप्प्यातील 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकून संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिला. यामुळे आता सनरायझर्स हैदराबादने नव्या हंगामासाठी आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत.
व्हिटोरी होते आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक : सनरायझर्स हैदराबादचे नवे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले आहे. तसेच ते 2014 ते 2018 या कालावधीत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. व्हिटोरी सध्या ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. व्हिटोरी यांच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने गमावलेली लय परत आणण्यासोबतच संघाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी असेल. आयपीएलच्या गेल्या सहा हंगामात हैदराबादने पाचव्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलला आहे. आयपीएल 2023 पूर्वी ब्रायन लारा यांनी टॉम मूडीची जागा घेतली होती.