मुंबई :यंदा आयपीएलचा पंधरावा हंगाम ( 15th edition of IPL ) खेळला जाणार आहे. यंदा आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत. याबाबत राज्य शासनाने या स्पर्धेसाठी नियमावली आखली आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळात 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हॉटेल ते सरावाच्या ठिकाणी जाण्यासाठी खेळाडूंना स्वतंत्र वाहतूक लेन राखीव ठेवण्यात येणार आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आढावा बैठकी बाबत माहिती देताना आयपीएल आयोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक -
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांच्या उपस्थितीत, आयपीएल पंधराव्या हंगामाच्या आयोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि बीसीसीआयचे सीईओ या बैठकीला उपस्थित होते.
आयपीएलच्या पंधराव्या पर्वाला 26 मार्चला सुरुवात -
येत्या 26 मार्च पासून आयपीएलचे पंधरावे पर्व ( Fifteenth edition of IPL ) सुरू होत आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे मुंबईत आयपीएल घेता आली नव्हती. मात्र यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आयपीएलचे सामने मुंबईत होणार आहेत. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर ( Meeting at Sahyadri Guest House ) झालेल्या महत्वाच्या बैठकीत, प्रेक्षकांची उपस्थिती आणि संघांना हॉटेल ते सराव मैदान दरम्यान वाहतूक मार्गात विना अडथळा प्रवासबाबत चर्चा करण्यात आली.
सुरुवातीला 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी परवानगी -
कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. सध्या रूग्ण घटले असले तरी, कोरोना अद्याप गेलेला नाही. क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेत, सुरुवातीला 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी ( 25 percent audience attendance allowed ) देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवसांचा आढावा घेऊन, 50 टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
खेळाडूंना ये-जा करण्यासाठी राखीव लेन -
मुंबईतील वानखेडे स्टेडियम ( Wankhede Stadium in Mumbai ), ब्रेब्रॉन आणि नवी मुंबईतील डी. वाय. स्टेडियमवर एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम ( Maharashtra Cricket Association Stadium ) होणार आहेत. बीसीसीआयने या सामन्याकरिता सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे. त्यामुळे सरावाला किंवा सामने खेळण्यासाठी जाताना रहदारीचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन राखीव ठेवली जाणार आहे. आजच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.