पल्लेकल : भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला आहे. टी-20 मालिका 2-1ने जिंकल्यानंतर भारताने दुसरी वनडे 10 गडी राखून जिंकली ( India Women won by 10 wickets ). त्यामुळे भारतीय महिला संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना ( Star opener Smriti Mandhana ) आणि शेफाली वर्मा यांनी या सामन्यात शानदार फलंदाजी केली. या दोघींनी अर्धशतके ठोकत भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत सहज विजय मिळवून दिला. स्मृतीने 83 चेंडूत नाबाद 94 आणि शेफालीने 71 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या.
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून ( Captain Harmanpreet Kaur won the toss ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून उत्तम गोलंदाजी झाली आणि रेणुका सिंगने 10 षटकांत 1 मेडन आणि 28 धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा यांनीही किफायतशीर गोलंदाजी करत 2-2 बळी घेतले. यामुळे यजमानांचा संघ निर्धारित 50 षटकांत 173 धावा करत सर्वबाद झाला.