लाहोर:श्रीलंकेचा महिला संघ ( Sri Lanka women's team ) तीन टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. हा दौरा यावर्षी 24 मे ते 5 जून या कालावधीत आयोजित केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( Pakistan Cricket Board ) गुरुवारी याची पुष्टी केली. तीन एकदिवसीय सामने हे आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग असणार आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या पुढे पाचव्या स्थानावर आहे. 2022 ते 2025 या कालावधीत चालणाऱ्या आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात करणारी ही पहिली मालिका असेल.
सर्व सामने कराचीतील साउथेंड क्लबमध्ये खेळवले जातील. डिसेंबर 2018 मध्ये तीन T20 सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तानची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ ( Pakistan captain Bismah Maroof ) प्रथमच मायदेशात महिला चॅम्पियनशिप ( Women's Championship ) सामना खेळण्यासाठी उत्साहित आहे. बिस्माह मारूफ म्हणाली, आमच्या घरच्या मैदानावर आयसीसी महिला चॅम्पियनशिप खेळण्याची आमच्यासाठी मोठी संधी आहे आणि श्रीलंकेचे स्वागत करण्यासाठी संघ खूप उत्सुक आहे. या हंगामात आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची आणि देशांतर्गत परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी मिळणार आहे.
बिस्माह मारूफ पुढे म्हणाली, मला खात्री आहे की, संघ आपल्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करेल आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना, ज्यांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला आहे, ते चांगले आणि सातत्यपूर्ण निकाल पाहतील. दोन्ही संघ 19 मे रोजी कराचीला पोहोचतील आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आधी तीन दिवस सराव करतील. पीसीबीच्या एका निवेदनात म्हटले आहे की, ही पाकिस्तानमधील पहिली आंतरराष्ट्रीय मालिका देखील असेल, ज्यामध्ये कोविड-19 प्रोटोकॉलचे कठोर निर्बंध लागू होणार नाहीत.