कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. श्रीलंका बोर्डाने 15 सदस्यीय संघ निवडला असून या संघाचे नेतृत्व दसुन शनाका याच्याकडे सोपवण्यात आले आहे. शनाका याने भारताविरूद्धच्या मायदेशातील मालिकेत कर्णधारपद भूषवले होते. श्रीलंकेचा संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरूवात 18 ऑक्टोबर रोजी नामिबिया संघाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस आणि दनुष्का गुणाथिलाका यांना टी-20 विश्वकरंडकासाठी संधी दिली नाही. कारण त्यांनी जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यात कोविड प्रोटोकॉल मोडला होता. यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर कारवाई करत एक-एक वर्षांची बंदी घातली आहे. दुसरीकडे माजी कर्णधार कुशल परेराची संघात वापसी झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 21 वर्षीय फिरकीपटू महेश थिक्षाना याला संघात स्थान मिळाले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू सामन्यात 4 गडी बाद केले आहेत. याशिवाय फिरकीपटूंमध्ये प्रविण जयविक्रमा याची संघात निवड आहे. वानिंदु हसरंगा देखील संघात आहे.