मुंबई - आयपीएल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये असताना खेळाडूंना बऱ्याच नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करावे लागते. परंतु, भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना सूचना केलेले फारसे आवडत नसल्याचे, मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांनी सांगितलं.
काय म्हणाले जेम्स पेमेंट -
बायो बबलविषयी सांगताना जेम्स पेमेंट म्हणाले की, 'भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना त्यांच्यावर निर्बंध लादलेले आणि सतत सूचना केलेले फारसे आवडत नाही. परंतु, आम्हाला भारतामध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होईल किंवा आमच्या जीवाला धोका असेल, असे आम्हाला कधीही वाटले नाही. मात्र, प्रवास करताना आम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, याचा अंदाज आम्हाला होता.'
बायो-बबलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच आमची चिंता वाढली. चेन्नईच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळाले. आम्ही त्यांच्याविरुद्ध त्याआधीच सामना खेळला होता. त्यामुळे आमचे खेळाडू थोडे घाबरले होते, अशी कबुली देखील जेम्स यांनी दिली.