कोलंबो - श्रीलंका क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. श्रीलंकेचा मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार कुशल मेंडिस, यष्टीरक्षक निरोशन डिकवेला आणि अष्टपैलू खेळाडू दनुष्का गुनाथिलाका यांच्यावर एक वर्षांची बंदी घातली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज बुधवारी हा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी हे तिनही खेळाडू इंग्लंडमध्ये बायो बबलचे प्रोटोकॉल तोडल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघात टी-२० मालिका पार पडली. त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी कुशल मेंडिस, निरोशन डिकवेला आणि दनुष्का गुनाथिलाका बायो बबलचे नियम मोडून डरहमच्या रस्त्यावर फिरताना दिसून आले. या खेळाडूंचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या घटनेची गंभीर दखल घेतली आणि तात्काळ त्या खेळाडूंना श्रीलंकेला परत बोलावलं. हे तिनही खेळाडू मंगळवारी श्रीलंकेत दाखले झाले. आज श्रीलंका बोर्डाने त्या खेळाडूंचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे. याशिवाय त्यांच्यावर दंडात्मक करावाई देखील करण्यात येण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून तिघे बाहेर
कुशल मेडिंस, निरोशन डिकवेला आणि दनुष्का गुनाथिलाका यांची १ वर्षाची शिक्षा जून २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. याचा अर्थ असा होते की, हे तिनही खेळाडू या वर्षी यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंका संघाला मोठा धक्का बसेल. कारण हे तिघेही अनुभवी खेळाडू आहेत.