कोलंबो -पहिल्या एकदिवसीय सामन्यात नव्या दमाच्या भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान ३६.४ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला. तर इशान किशन ५९ तर पृथ्वी शॉ याने ४३ धावांचे योगदान दिले. भारताने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
कुलदीपने श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो या जोडीने ४९ धावांची सलामी दिली. फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात मैदानावर स्थिरावलेल्या अविष्का फर्नांडोला (३२) मनीष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कुलदीप यादवने पदार्पणवीर भानुका राजपक्षाला तसेच मिनोद भानुकाला बाद करत लंकेला बॅकफूटवर ढकलले.
चमिका करुणारत्नेची फटकेबाजी
कर्णधार दासुन शनाका आणि चरिथा असालांकाने लंकेचा डाव सावरला. अखेरच्या षटकात चमिका करुणारत्नेने फटकेबाजी करत संघाला २६२ अशी धावसंख्या गाठून दिली. करुणारत्नेने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.