हैदराबाद Shubman Gill : जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये 'प्रिन्स' म्हणून ओळखला जाणारा भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल लवकरच एक नवा कीर्तिमान रचू शकतो. या २४ वर्षीय खेळाडूनं फार कमी वेळात अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा हे त्यापैकी काही विक्रम. गिलचं पुढील लक्ष्य आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर १ फलंदाज बनण्याचं आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम असून, अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.
अव्वल क्रमांकाच्या फलंदाजापेक्षा ६ गुण मागे : ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८२९ रेटिंग गुणांसह जगातील नंबर १ फलंदाज आहे. तर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ८२३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांमध्ये केवळ ६ रेटिंग गुणांचा फरक असून, हा फरक अत्यंत शुल्लक मानला जातो. या विश्वचषकात ५ सामन्यांमध्ये ३ शतकं झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ७६९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता शुभमन गिलला रॅंकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवण्यासाठी काही चांगल्या खेळींची गरज आहे.