मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएल २०२१ चा विजेता कोण ठरणार? याबाबत सूचक इशारा दिला आहे. शास्त्री यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर हा इशारा दिला आहे.
अहमदाबादमध्ये मंगळवारी झालेला आयपीएल २०२१ मधील २२ वा सामना रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या रोमांचक सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी एक सूचक ट्विट करत नव्या विजेत्याबाबत इशारा केला आहे. यंदा कोणता जुना संघ नाही तर नवा संघ आयपीएलचा विजेता होईल. त्याचे बी आता पेरले गेले आहे, अशा आशयाचे ट्विट शास्त्री यांनी केले आहे.