नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ( Former captain Mahendra Singh Dhoni ) रिअल इस्टेट फर्म आम्रपाली समूहाविरुद्ध ( Real estate firm Amrapali Group ) काही आर्थिक वादात सुरू केलेल्या, लवादाच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. धोनी बंद पडलेल्या रिअल इस्टेट कंपनी समूहाचा 'ब्रँड अॅम्बेसेडर' होता.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटरने न्यायालयाला सांगितले होते की, आम्रपाली समूहाने धोनीच्या ब्रँडची जाहिरात करणाऱ्या रिथी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (RSMPL) सोबत घर खरेदीदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यासाठी एक काल्पनिक करार केला होता. तसेच, 2009 ते 2015 दरम्यान RSMPL ला एकूण 42.22 कोटी रुपये दिले गेले. धोनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 16 ऑक्टोबर 2019 रोजी माजी न्यायाधीश वीणा बिरबल यांना क्रिकेटपटू आणि रिअल इस्टेट कंपनी यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी एकमेव मध्यस्थ म्हणून नियुक्त केले होते.
न्यायमूर्ती यू यू ललित आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी न्यायालयाने नियुक्त केलेल्या 'रिसीव्हर'ने धोनी आणि रिअल इस्टेट कंपनी यांच्यातील प्रलंबित लवादाची कार्यवाही आणि ती पुढे नेण्यात त्यांना येणाऱ्या समस्यांचे स्पष्टीकरण दिले. रिसीव्हर हा न्यायालयाचा अधिकारी असतो जो न्यायालयाला खटल्याशी संबंधित साहित्य जपून ठेवण्यात मदत करतो. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही.