नवी दिल्ली :16व्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि कांगारूंचा कर्णधार पॅच कमिन्स कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत तर भारताने 30 सामने जिंकले आहेत.
तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर :या दोघांमध्ये 28 सामने अनिर्णित राहिले तर एक सामना बरोबरीत राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे 5 खेळाडू (IND vs AUS) यशस्वी झाले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 39 सामन्यांमध्ये 3630 धावा केल्या आहेत ज्यात 11 शतकांचा समावेश आहे. त्याच्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने 28 सामन्यात 2434 धावा केल्या आहेत ज्यात 6 शतकांचा समावेश आहे.
कसोटी सामन्यांमध्ये भिंत :भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कसोटी सामन्यांमध्ये भिंत म्हटले जाते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 32 कसोटी सामन्यांमध्ये 2143 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सामन्यात 1893 धावा केल्या आहेत. याशिवाय वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 22 कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांसह 1738 धावा केल्या आहेत. सेहवागनेही भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे.