मुंबई - भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज 'आंतरराष्ट्रीय नर्स डे'च्या निमित्ताने सर्व नर्सेसचे आभार मानले आहेत. जगासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा कठीण स्थितीत नर्सेस आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सचिनने त्याच्या ट्विटरचा डीपी देखील बदलला आहे.
आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे. या निमित्ताने सचिनने त्यांच्या ट्विटरवरून ३ नर्सचा एकत्रित असलेला फोटो शेअर केला आहे. त्या फोटो संदर्भात त्याने सविस्तर माहिती दिली आहे. लालनुन्हलिमी, लालरोजामी आणि ऐबांसी रानी अशी या तिघी नर्सेसची नावे आहेत. आसामच्या मकुंडा रुग्णालयातील हा फोटो आहे. या नर्सेस आसाम, मिझोराम आणि त्रिपुराच्या सीमेजवळ दुर्गम भागात असलेल्या मकुंडा रुग्णालयात कार्यरत असल्याचा उल्लेख सचिने केला आहे.
नर्सेसचा फोटो शेअर करताना सचिनने लिहलं आहे की, 'नर्सेस शांतपणे मानवतेची सेवा करीत आहेत. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्यासाठी त्या रात्री जागतात. त्यांना आपली काळजी असते. साथीच्या रोगात, आपल्याला त्यांचे अधिक महत्त्व कळले. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाच्या शुभेच्छा.'