मुंबई - भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत भविष्यावाणी केली आहे. त्याने स्पर्धेचा अंतिम सामना कोणता संघ जिंकणार याविषयी आपलं मत मांडलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून या दरम्यान अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. याचं कारण देखील सचिन याने सांगितलं आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सचिन म्हणाला, 'अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळला आहे. या मालिकेमध्ये त्यांचा 1-0 ने विजय झाला, त्यामुळे इंग्लंडमधील परिस्थितीचा आणि वातावरणाचा अंदाज न्यूझीलंड संघाला आला आहे. दुसरीकडे भारतीय संघाला मात्र सरावाला फार वेळ मिळाला नाही. विराट कोहलीच्या संघाने फक्त एक इंट्रा स्क्वाड मॅच खेळली आहे.'
सचिनने यावेळी बोलताना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेवरही आक्षेप घेतला. याविषयी तो म्हणाला, 'दोन सामन्याचीही मालिका अंतिम सामना संपल्यानंतर खेळवली गेली पाहिजे होती. कारण या मालिकेमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये काहीही फरक पडणार नव्हता. इंग्लंडने कसोटी मालिका खेळवून न्यूझीलंडला तयारी करण्याची संधी दिली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. साउथम्पटन येथे या सामन्याला 18 जूनपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा -WTC Final : भारताविरुद्धच्या 'महामुकाबल्या'साठी न्यूझीलंड साउथम्पटनमध्ये दाखल
हेही वाचा -WTC FINAL: टीम इंडियाला 'विराट' चिंता, १८ वर्षांपासून न्यूझीलंड अजेय