हैदराबाद Saba Karim Exclusive :भारतीय संघ रिंकू सिंगकडे फिनिशर म्हणून पाहत असून तो भारतीय संघासाठी आपली भूमिका सक्षमपणे पार पाडू शकतो, असं मत भारताचे माजी यष्टिरक्षक साबा करीमनं व्यक्त केलंय.
सध्या भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळत आहे. यात भारतीय संघ 3-1 नं आघाडीवर आहे. रिंकू सिंगनं भारतीय संघासाठी फलंदाजीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याची खेळी स्फोटक होती. त्यात त्यानं अवघ्या नऊ चेंडूंमध्ये नाबाद 31 धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत केली होती.
- रिंकू सिंगला फिनिशर म्हणून तयार करता येईल का या प्रश्नावर साबा करीम म्हणाले की डावखुरा फलंदाज सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडू शकतो.
भारतीय संघ रिंकू सिंगकडे फिनिशर म्हणून पाहत आहे. प्रथम फलंदाजी करताना तसंच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तो विश्वासू खेळाडू आहे. संघ व्यवस्थापन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी पाठीशी घालत आहे. पुढील काळात काही कठीण आव्हानं आहेत. दक्षिण आफ्रिकेची मालिका आणि रिंकूसाठी ही मोठी कसोटी असेल, कारण खेळण्याची परिस्थिती घरच्या परिस्थितीपेक्षा वेगळी असणार आहे. त्याला विविध प्रकारच्या खेळप ट्ट्यांशी जुळवून घ्यावं लागेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा अनुभव आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर असताना तो उपयुक्त आहे. तो स्ट्राइक रोटेट करु शकतो तसंच मोठे फटके मारु शकतो. तसंच त्यानं हे दाखवून दिलंय की तो एक दर्जेदार फिनिशर बनतोय, असं करीमनं ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलंय.
- दोन्ही संघ त्यांच्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत आहेत. त्यामुळं खेळाडूंचा एक गट मालिका जिंकण्यासाठी लढताना दिसत आहे. 34 एकदिवसीय सामने खेळलेल्या साबा करीमला वाटते की उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस ऑस्ट्रेलियन संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करु शकतो. यापैकी बहुतेक खेळाडू दोन हंगामांसाठी ऑस्ट्रेलियन संघासोबत आहेत. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड हा असाच एक खेळाडू आहे. ज्यानं मागील काही काळात मोठी मजल मारली आहे. या संघातील तीन किंवा चार खेळाडू ऑस्ट्रेलियन क्रिकेटला पुढं नेऊ शकतात. नाथन एलिस हा असाच एक खेळाडू आहे, जो येत्या काही वर्षांत त्याच्या प्रभावी गोलंदाजीनं प्रभावी ठरेल, असंही करीमनं सांगितलं.
- या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मासह बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यानं मुंबईकर सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाबाबत साबानं मत व्यक्त केलं की, तो एक चांगला कर्णधार आहे. त्याच्या आक्रमक कौशल्यानं तो फलंदाजी करत आहे.