गुवाहाटी IND Vs AUS 3rd T20 : तिसरा T20 सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहटीत गेला. यावेळी ऋतुराज गायकवाडनं नाबाद 123 धावा केल्या. त्यानं सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलं शतक ठोकलंय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांना देखील ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 मध्ये शतक ठोकता आलं नव्हतं. ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत 222 धावांचा डोंगर उभा केला. टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव यांनी छोट्या खेळी करत धावसंख्या वाढवली. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
दोन फलंदाज अवघ्या 24 धावांत बाद :ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अवघ्या 24 धावांत माघारी परतले. यशस्वी जैस्वाल सहा धावा करून बाद झाला, तर इशान किशनला खातंही उघडता आलं नाही. दोन विकेट गमवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं ऋतुराजच्या साथीनं भारताचा डाव सावरला.