दुबई Rishabh Pant IPL Auction 2024 : यष्टिरक्षक फलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचला. गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला रुरकीजवळ पंतचा अपघात झाला होता. यानंतर तो क्रिकेटपासून दूर राहिला, तेव्हापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) सतत सराव करत होता. अशा परिस्थितीत तो प्रथमच क्रिकेटच्या मोठ्या मंचावर दिसला.
पुढील आयपीएलमध्ये होणार सहभागी : ऋषभ पंत पुढील वर्षी आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार असून दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्वही करणार असल्याचं सांगितलं जातंय. पंत फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आगामी आयपीएल सुरु होईल अशी शक्यता आहे. पंतच्या अनुपस्थितीत, डेव्हिड वॉर्नरनं आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व केलं होतं. पंतच्या अनुपस्थितीमुळं आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी अत्यंत खराब झाली होती.
अशी कामगिरी करणारा पहलाच कर्णधार :25 वर्षीय पंत आयपीएल थेट लिलावात सक्रियपणे सहभागी होणारा पहिला कर्णधार ठरलाय. लिलावादरम्यान ऋषभ पंत आयपीएलच्या लिलावाच्या टेबलवर सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगसोबत दिसला. तिथंही त्यानं बोलीही लावली. लिलावासाठी संघाच्या नियोजनात पंतचा सहभाग होता. तसंच त्यानं प्रशिक्षक पाँटिंगसोबतच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतल्याचं फ्रेंचायझीच्या सूत्रांनी सांगितलं.