नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते आता ऋषभ पंतची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच भारतीय संघाला यष्टिरक्षक फलंदाजाचीही कमतरता जाणवत आहे. आता टीम इंडिया आणि पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंत आता लवकरच क्रिकेट स्टेडियममध्ये खेळताना दिसणार आहे. पंतने पुन्हा एकदा मैदानावर आगपाखड करण्याची तयारी सुरू केली आहे.
टीम इंडियात पुनरागमनाच्या तयारीसाठी मेहनत :25 वर्षीय युवा फलंदाज ऋषभ पंत जवळपास 6 महिन्यांच्या दुखापतीनंतर झपाट्याने बरा होत आहे. आता ऋषभ पंत टीम इंडियात पुनरागमनाच्या तयारीसाठी मेहनत घेत आहे. पंत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. NCA मधील पंत त्याच्या तब्येतीची माहिती वेळोवेळी चाहत्यांशी शेअर करत असतो. पंतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पंत कोणत्याही आधाराशिवाय एकटेच पायऱ्या चढताना दिसत आहेत. यावरून पंत लवकरच बरा होणार असून मैदानावर खेळताना दिसणार आहे, याचा अंदाज बांधता येतो. हा व्हिडिओ पाहून पंतचे चाहते कमालीचे आनंदित झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांच्या छान प्रतिक्रिया येत आहेत.