नवी दिल्ली :आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने देवधर ट्रॉफीमध्ये आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. आयपीएल नंतर आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही रिंकूची बॅट चांगलीच तळपत आहे.
दडपणाखाली अर्धशतक झळकावले : सोमवारी मध्य विभागाकडून खेळताना रिंकूने पूर्व विभागाविरुद्ध दडपणाखाली अर्धशतक झळकावून संघाला संकटातून बाहेर काढले. त्याच्या खेळीने संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला. रिंकूचे फॉर्ममध्ये राहणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण त्याचा सप्टेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
रिंकू आशियाई स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावेल : 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची जबाबदारी युवा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहवर असणार आहे. भारताला चॅम्पियन बनवण्यात या फिनिशरची भूमिका खूप महत्त्वाची मानली जात आहे, कारण युवा असूनही रिंकू एखाद्या परिपक्व फलंदाजाप्रमाणे खेळतो. त्याने अनेकवेळा आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत सामने जिंकून दिले आहेत. तो परिस्थितीनुसार खेळ खेळतो. त्याला केव्हा टिच्चून फलंदाजी करायची आणि केव्हा वेगवान धावा काढायच्या हे चांगलेच माहीत आहे.