मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा आहे २००५ सालचा. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्व इलेव्हनमध्ये तीन एकदिवसीय आणि १ कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात आली होती. राहुल द्रविड विश्व इलेव्हनचा भाग होता.
रिकी पाँटिंग क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला की, 'आम्ही जेव्हा सराव करत होतो. तेव्हा मैदान ओलं होतं. त्यामुळे मी संघातील खेळाडूंना फुटबॉलचे शूज घालून सराव करण्याचा सल्ला दिला. आमचा हा सराव विरोधी संघाने पाहिला. दुसऱ्या दिवशी ते आमच्या पेक्षा आधी नेटमध्ये पोहोचले. मी तिथं गेल्यानंतर पाहिलो की, द्रविड फुटबॉलचे शूज घालून फलंदाजीचा सराव करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलचे शूज घालून सराव करणे किती कठीण असते, याची कल्पना आपण करू शकतो.'
आम्ही द्रविडला सराव करताना पाहत होतो. त्याचे पाय अनेकवेळा घसरत होते. पण तो त्या स्थितीत देखील सतत पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आम्हाला पाहिलं आणि सांगितलं की, तुम्ही सुद्धा असा सराव केला पाहिजे. तेव्हा आम्ही त्याला सांगितलं की, आम्ही हे शूज फक्त क्षेत्ररक्षण करताना घालतो. हा एक मजेशीर किस्सा होता, असेही पाँटिंगनं सांगितलं.