साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटन येथे खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर असून भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. अशात भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन याने त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली.
आयसीसीने अश्विनचा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिआ अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अश्विन त्याच्या निवृत्तीबाबत सांगताना पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धींमुळे मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. सतत सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनामुळे मी कारकिर्दीत यश मिळवले आहे. त्यात कोणतीच तडजोड मी केलेली नाही. खेळात सुधारणा करत राहण्याचा माझा प्रयत्न सुरूच असतो. पण नवीन काही करण्याची इच्छाच जेव्हा संपेल, तेव्हा मी खेळणं सोडून देईन, असे अश्विनने सांगितलं.