नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या (३६/०) आहे. त्याचबरोबर भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विन आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
अनिल कुंबळेचा विक्रम मोडला : चौथ्या कसोटीत भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या अश्विनने पहिल्या डावात 6 बळी घेतले. टॉड मर्फीच्या रूपाने पाचवी विकेट घेताच, अश्विनने माजी भारतीय गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर सहावी विकेट घेतल्यानंतर अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे कुंबळेने बीजीटीच्या 20 सामन्यात 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनने आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 22 सामन्यात 113 विकेट्स घेतल्या आहेत.