बंगळूर-बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी करंडक ( Ranji Trophy Final ) क्रिकेट स्पर्धेचा थरार क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश टीममध्ये अत्यंत चूरशीची लढत दिसून आली. सर्फराज खान ( Sarfaraz Khan ) ची धावांची खेळी चालू रणजी ट्रॉफी हंगामातील चौथ्या शतकासह कायम राहिली. मध्य प्रदेशविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत मुंबईने 122 षटकांत 351/8 अशी मजल मारली.
सामन्याच्या पहिल्या दिवशी सावध राहिल्यानंतर, सरफराज खानने दुसऱ्या दिवशी नाबाद 119 धावा केल्या. त्यामुळे त्याने रणजी ट्रॉफी हंगामात 900+ धावांचा टप्पा पार केला आहे, याआधीही त्याने 2019/20 मध्ये 928 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या 87 वर्षाच्या इतिहासामध्ये सरफराज हा तिसराच खेळाडू आहे ज्याने दोन रणजीच्या हंगामात 900 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याआधी अजय शर्मा आणि वसीम जाफर यांनी ही कामगिरी केली आहे.