अहमदाबाद -देशांतर्गंत क्रिकेट स्पर्धांमधील सर्वात मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धेला ( Ranji Trophy Tournament ) आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली आहे. रणजी ट्रॉफी 2022 या स्पर्धतील मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेने शतक ( Ajinkya Rahane century against Saurashtra) झळकावले आहे. अजिंक्य रहाणेने 212 चेंडूचा सामना करताना 100 धावांची खेळी साकारली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेले.
मुंबईची धावसंख्या 22/2 अशी होती तेव्हा रहाणेने खडतर पॅचमधून आपल्या संघाला बाहेर काढले. 12 व्या षटकात त्यांनी संघसहकारी सचिन यादवला गमावले, परंतु सर्फराज खानने (85) रहाणेसह मुंबईच्या डावाला (219/3) सावरले. या अगोदर दिल्लीचा फलंदाज यश धुलने चालू असलेल्या रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप एच ( Ranji Trophy Elite Group H ) स्पर्धेत प्रथम श्रेणी पदार्पणात आपल्या शतकाची नोंद केली आहे.
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट ग्रुप एच स्पर्धेत धुलने तामिळनाडूविरुद्ध शतक ( Yash Dhul century against Tamil Nadu ) झळकावले. सलामीला पाठवलेल्या धुलने अवघ्या 133 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. 97 धावांवर धुलला एम मोहम्मदने बाद केले होते. परंतु चेंडू नो-बॉल असल्याने दिल्लीच्या युवा फलंदाजाला दिलासा मिळाला.
यश धुलने भारताला आयसीसीच्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत ( ICC Under-19 World Cup ) पाचव्यांदा विजतेपद मिळवून दिले होते. यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला फायनल सामन्यात मात देत विजेतेपद पटकावले होते. रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात होणार असून, पुढील टप्पा आयपीएलनंतर 30 मे ते २६ जून या कालावधीत होणार आहे. या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये 62 दिवसांत 64 सामने खेळवले जाणार आहेत.