बंगळुरू: रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सुवेद पारकर (विक्रमी 252), सरफराज खान (153) आणि यशस्वी जैस्वाल यांच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तराखंडचा विक्रमी 725 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ( Mumbai set new world records ) आहे.
मुंबईच्या विजयात शम्स मुलाणीचाही मोलाचा वाटा -
प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे तर, याआधी 1929-30 मध्ये न्यू साउथ वेल्सने क्वीन्सलँडचा 685 धावांनी पराभव करून धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला होता. मात्र मुंबईने 93 वर्षांनंतर हा विक्रम मोडीत काढला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने उत्तराखंडचा मोठ्या फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या विजयात शम्स मुलाणीचाही मोलाचा वाटा ( Shams Mulani important role Mumbai victory ) होता. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले.
मुंबईने आपला पहिला डाव 647/8 धावांवर घोषित केला. त्यानंतर उत्तराखंडला पहिल्या डावात केवळ 114 धावा करता आल्या. या डावात मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक पाच बळी घेतले. तसेच 533 धावांच्या आघाडीसह मुंबईने दुसरा डाव 261/3 वर घोषित केला आणि उत्तराखंडसमोर 794 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. उत्तराखंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा साफ निराशा केली आणि लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांत ऑलआऊट (सर्वबाद) झाला.