नवी दिल्ली: बीसीसीआयने न्यूझीलंड-अ संघाविरुद्ध ( India A vs New Zealand A ) होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली ( India A squad announced for ODI series ) आहे. या संघाची कमान स्टार फलंदाज संजू सॅमसनच्या खांद्यावर सोपवण्यात आली ( India A captain Sanju Samson ) आहे. टी-20 विश्वचषक संघात संजू सॅमसनची निवड न झाल्याने, त्याच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर रोष व्यक्त केला होता. त्यामुळे कर्णधार पदाची माळ संजूच्या गळ्यात टाकण्यात आली असावी.
युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावाचा ( Young allrounder Raj Angad Bawa ) संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील भारत अ संघात समावेश करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरपासून न्यूझीलंड अ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला चेन्नई येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पुढील दोन सामने 25 आणि 27 सप्टेंबर रोजी होणार आहेत. चेन्नई या तिन्ही सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने चमकदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉचा ( Prithvi Shaw ) या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच यात भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे. भारताला अंडर-19 विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारा बावा हा मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज आहे.