नवी दिल्ली Rahul Dravid : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत सुरू असलेला सस्पेन्स अखेर समाप्त केला. संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड भविष्यातही मुख्य प्रशिक्षकपदी राहतील. द्रविडसोबतच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा करारही वाढवण्यात आला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल याबाबत बीसीसीआयनं अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मणला 'ही' जबाबदारी : नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपला होता. कालावधी संपल्यानंतर बीसीसीआयनं द्रविडशी चर्चा केली. त्यानंतर सार्वमतानं कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय बोर्डानं व्हीव्हीएस लक्ष्मणला एनसीएचा प्रमुख आणि स्टँड-इन मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवलंय. बीसीसीआयनं राहुल द्रविडचं मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामाचं कौतुक केलं.
बीसीसीआयनं केलं द्रविडचं कौतुक : बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, "राहुल द्रविडची दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम हे टीम इंडियाच्या यशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडकडे केवळ आव्हानं स्वीकारण्याचीच नाही तर प्रगती करण्याची क्षमता आहे. भारतीय संघाची कामगिरी त्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाचा पुरावा आहे. त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली याचा मला आनंद वाटतो", असं त्यांनी नमूद केलं.