मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक अजब रेकॉर्ड केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पिता-पुत्रांच्या जोडीला बाद करणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
पिता आणि पुत्रांची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज : अश्विनने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तेजनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली. त्याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये पिता आणि पुत्रांची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल देखील वेस्ट इंडीजसाठी क्रिकेट खेळायचे. अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत शिवनारायणलाही बाद केले आहे.
अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड केले : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अश्विनने यजमान संघाची पहिली विकेट घेतली. वेस्ट इंडिजचा तेजनारायण चंद्रपॉल कर्णधार क्रेग ब्रॅथवेटसह सलामीला आला. दोघेही क्रीजवर जमण्याचा प्रयत्न करत होते, तोच अश्विनने 13 व्या षटकात ही भागीदारी मोडली. विंडीजच्या पहिल्या डावातील 13 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड केले. त्याने 44 चेंडूत 12 धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली.