मुंबई - कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने कौतुकास्पद काम केलं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्याने भारतालामदत केली आहे. त्याने ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास ३८ लाख रुपये पीएम केयर फंडला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य सहकाऱ्यांनाही त्याने भारताला मदत करण्याचं आवाहन केले आहे.
पॅट कमिन्सने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, मी अनेक वर्ष भारतात येत आहे आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. भारतीय खूप चांगले आहेत. कोरोना संकटात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू आहे. पण मी भारत सरकारला सांगू इच्छितो की, लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.'
'एक खेळाडू म्हणून माझी काही जबाबदारी आहे आणि मी पीएम केयर फंडसाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचे आवाहन करतो,' असेही पॅट कमिन्सने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केकेआरने कमिन्सला १५.५० कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे.